घाणेगावात शिवरायांचा, तर नांदागावात महाराणा प्रतापांचा भव्य पुतळा अनावरण

घाणेगावात शिवरायांचा, तर नांदागावात महाराणा प्रतापांचा भव्य पुतळा अनावरण

 

 

तालुका सोयगाव

 

प्रतिनिधी संतोष गर्दे

 

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही सावळदबारा परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

 

इद्रिस मुलतानी यांचे आश्वासन पूर्ण करण्याचे आश्वासन पाच गावांत सुमारे एक कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

 

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तर नांदागाव येथे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. घाणेगाव येथे शनिवारी रात्री माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यांसह सावळदबारा परिसरातील पाच गावांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सावळदबारा परिसराच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडली. ‘मी असेपर्यंत सावळदबारा परिसराच्या विकासासाठी कुठूनही निधी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली. त्यांच्या या आश्वासनामुळे परिसरातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचे अखंड प्रतीक आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, कुशल नेतृत्व, दूरदृष्टी आणि रयतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देत आहे. घाणेगाव येथे उभारण्यात आलेला महाराजांचा भव्य पुतळा भावी पिढ्यांना स्वराज्याचा गौरवशाली इतिहास आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा ठरणार आहे.

तर नांदागाव येथे क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याची उभारणी करण्यात आली. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्याग, शौर्य आणि स्वाभिमानाचा इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. दोन्ही महापुरुषांच्या स्मारकांच्या अनावरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पाच गावांत विकासकामांचा शुभारंभ

या दौऱ्यादरम्यान सावळदबारा परिसरातील पाच गावांत विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. देव्हारी येथे सिमेंट रस्ता व सामाजिक सभागृह, डाभा येथे सामाजिक सभागृह, नांदा तांडा येथे सिमेंट रस्ता, घाणेगाव येथे सामाजिक सभागृह, तर मूर्ती येथे सामाजिक सभागृहाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सोयीसुविधांना चालना मिळणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करणार : इद्रिस मुलतानी

यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनीही आपल्या भाषणातून परिसराच्या विकासाबाबत भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी आपण जी आश्वासने दिली आहेत, ती सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गरुड, सुनील मिरकर, सोयगाव सभापती उत्तम चव्हाण, माजी सभापती नवलसिंग पाटील, शाखा अभियंता जे. के. चव्हाण, चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, पंचायत समिती सदस्या वृषालीताई मिरकर, सोयगाव भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य गजानन पवार, राहुल राठोड, सुनील गावंडे, संजीवन सोनवणे, जयप्रकाश चव्हाण, पंजाबराव कोलते, नितू ठाकूर, प्रकाश जाधव, सूरज कवाल, राजू रेनकोद, योगेश शिंदे, विनोद टिकारे, कृष्णा शिरसाट, फिरोज तडवी, मुकुंदा गायकवाड, अनिल राठोड, गोपाल गावडे, संभाजी पवार, विलास साबळे, अज्ञानसिंग राठोड, वरदान चव्हाण, सीताराम जाधव, उत्तम राठोड, ल. सलमान शहा, गुलाबराव कोलते, शांताराम खराटे, प्रमोद पाटील, जीवन कोलते, अतुल चव्हाण यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापुरुषांच्या भव्य स्मारकांचे अनावरण आणि विविध विकासकामांच्या शुभारंभामुळे सावळदबारा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विकासकामांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *