नरखेड पोलिसांची मोठी कारवाई; १६.५ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह दुचाकी जप्त, ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नरखेड पोलिसांची मोठी कारवाई; १६.५ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह दुचाकी जप्त, ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

 

नरखेड :

महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर नरखेड पोलिसांनी धडक कारवाई करत १६.५ किलो सुगंधित तंबाखू आणि एक दुचाकी असा एकूण ५२,३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, पळून गेलेल्या मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १९/०८/२०२६ रोजी नरखेड पोलिसांना मौजा इंदिरानगर बेलोना हेटी येथील हनुमान मंदिराजवळून सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच ३१ ए एल ९६४२ ही संशयास्पद स्थितीत येताना दिसली. सदर वाहनावर दोन इसम स्वार होते, मात्र पोलिसांना पाहताच त्यातील एक इसम दुचाकीवरून उतरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेला १६.५ किलोग्रॅम प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मिळून आला.

सदर ठिकाणी मिळून आलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे चौकशी केली असता पळून गेलेल्या साथीदाराचे नाव प्रिन्स पांडुरंग उईके (रा. पाण्याच्या टाकीजवळ, खडकपुरा, वार्ड क्र. ५, नाचनगांव, ता. देवळी, जि. वर्धा) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावरून २२,३०४ रुपये किमतीचा १६.५ किलो सुगंधित तंबाखू आणि ३०,००० रुपयांची होंडा स्प्लेंडर दुचाकी असा एकूण ५२,३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शासनाची बंदी असतानाही विक्रीच्या उद्देशाने साठा व वाहतूक केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन नरखेड येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास नरखेड पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *