*भरपावसात राहेर येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्साहात*
सगरोळी दि. ३० (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीनिमित्त राहेर (ता.नायगाव) येथून जवळच असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या सप्ताहाची आज धार्मिक वातावरणात सांगता झाली. यानिमित्त गावातून पारंपरिक दिंडी काढण्यात आली. विशेष म्हणजे, मुसळधार पावसाची तमा न बाळगता शेकडो वारकरी आणि भाविकांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बिलोली व नायगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, गुरुवारी (दि. ३०) राहेर परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत होता. तरीही गावातील अनेक वर्षांपासूनची आषाढी दिंडीची परंपरा अखंड राखण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात दिंडीने संपूर्ण गावाला भक्तिमय वातावरण लाभले.
दिंडी गावातील प्रत्येक घरासमोर पोहोचताच ग्रामस्थांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस झाला नव्हता; मात्र आज मुसळधार पाऊस असतानाही परंपरा खंडित होऊ नये, या भावनेतून भाविकांनी छत्र्यांसह दिंडीत सहभाग घेतला. दिंडीचे नेतृत्व दासागुरू जोशी यांनी केले.
हा सप्ताह व दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्तम पाटील इंगळे, दासागुरू जोशी, प्रवीण जोशी, सतीश जोशी, दत्तू महाराज जोशी, रमेश जोशी, गजानन जोशी, राजेश जोशी, संतोष जोशी, धनंजय जोशी (देशमुख) राहेरकर व मुकुंद देशमुख राहेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
भरपावसातही पारंपरिक दिंडीची परंपरा कायम राखत राहेरकरांनी विठ्ठल भक्तीचा अनोखा आदर्श घालून दिला.
