अंबिका फार्म हाऊस येथील ‘द क्विन्स व्हिला’वर पोलिसांची मोठी कारवाई; ३२ जणांवर गुन्हा दाखल,

अंबिका फार्म हाऊस येथील ‘द क्विन्स व्हिला’वर पोलिसांची मोठी कारवाई; ३२ जणांवर गुन्हा दाखल, ३० लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

 

 

कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांजरा गोविंद शिवारात असलेल्या अंबिका फार्म हाऊस येथील ‘द क्विन्स व्हिला’ येथे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर कोंढाळी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक २१ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि अड्डा चालविणाऱ्या अशा एकूण ३२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून रोकड, दोन चारचाकी वाहने व मोबाईलसह ३० लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच सावनेर व काटोल उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पांजरा गोविंद शिवारातील अंबिका फार्म हाऊसमध्ये ५२ ताशपत्त्यांवर पैशांची मोठी बाजी लावून हार-जितचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर फार्म हाऊसवर छापा टाकला असता अनेक इसम जुगार खेळताना रंगेहात मिळून आले.

प्राथमिक तपासात रोहित सुरेश श्रीरामे (रा. म्हाळगी नगर, नागपूर) याने हा जुगार भरविल्याचे समोर आले, तर नंदकिशोर गौतम हा ‘द क्विन्स व्हिला’ फार्म हाऊसचा व्यवस्थापक म्हणून जुगारासाठी जागा उपलब्ध करून देत होता. पोलिसांनी या दोघांसह नागपूर, वर्धा, बुटीबोरी तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि बैतूल येथील एकूण ३२ आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये ओमप्रकाश ठवळे, कृष्णा उईके, हितेश भगत, सुनिल बावणे, भुपेश माने, नेमीचंद सूर्यवंशी, गुरूपाल धुंडडाटे, गणेश पेरकुडे, रितेश गोडबोले, सौरभ कुरसो, सोनल श्रीरामे, रोहित उंदीरवाडे, प्रफुल घोडे, आयुष तेभुरकर, ओम देशमुख, अमन शाहू, अफरोज खान, अल्केश राजपूत, हरी हातागडे, सुधाकर घोनमोडे, गणेश लाचेरवार, भावेश ठाकरे, आदित्य सूर्यवंशी, निलय मेश्राम, रोहन समुद्रे, विकास चंदनबटवे, सादिक शहा, मंगेश अलोने, लोकेश जयस्वाल आणि नरेंद्र गिरी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून १६ लाख ०७ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम, जुगारासाठी वापरलेले ३४८ कॉईन, २ कॅट प्लास्टिक ताशपत्ते, १ नोटा मोजण्याचे यंत्र, स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH ४९ AS ४३४), तवेरा (क्रमांक MH १३ AV ८०९०) ही दोन चारचाकी वाहने आणि ३२ अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ३० लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ सह भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *