लाखोंचा निधी खर्चूनही रस्त्यांची काही महिन्यांतच दुरवस्था

*लाखोंचा निधी खर्चूनही रस्त्यांची काही महिन्यांतच दुरवस्था!*

 

*हरिजनटोली–हिरडामाली मार्गाच्या दोन्ही कामांवर प्रश्नचिन्ह; प्रत्येकी १० लाखांचा निधी खर्च,

सभापती चित्रलेखा चौधरी आक्रमक; तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी*

 

गोरेगाव, दि. १७ नोव्हेंबर : ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या पुरगाव अंतर्गत हरिजनटोली ते हिरडामाली या मार्गावरील रस्त्यांची अवघ्या काही महिन्यांतच दयनीय अवस्था झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील दोन स्वतंत्र रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, असा एकूण २० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, लाखो रुपये खर्चूनही रस्त्यांची अवस्था खराब झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावर ग्रामपंचायत सळख योजनेंतर्गत १० लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले, तर दुसरीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत १० लाख रुपये खर्चून डांबरीकरणाचे काम करण्यात आले. दोन्ही कामांवर मोठा निधी खर्च होऊनही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने सार्वजनिक पैशांचा विनियोग नेमका कसा झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बांधकामानंतर काही महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था!

रस्त्याचे बांधकाम सुरू असतानाच कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली होती. संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींच्या निदर्शनासही ही बाब आणून देण्यात आली होती. मात्र, तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता डांबरी रस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडले असून, सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडू लागली आहे. त्यामुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

उखडलेले डांबरीकरण, बाहेर आलेली गिट्टी; अपघाताचा धोका!

रस्त्याची झालेली दुरवस्था वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी उखडलेले डांबरीकरण, खराब झालेले सिमेंट काँक्रीट आणि बाहेर आलेली गिट्टी यामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. चांगल्या रस्त्याची अपेक्षा करणाऱ्या नागरिकांच्या पदरी मात्र खराब रस्त्याचा त्रास पडत आहे.

तक्रारींकडे दुर्लक्ष; देखरेख करणारे अधिकारी कोण?

रस्त्याची अवस्था बिकट झाल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही काही महिन्यांतच रस्त्यांची दुरवस्था होत असेल, तर बांधकामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने नेमके काय केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

सभापती चित्रलेखा चौधरी आक्रमक; दोन्ही कामांच्या चौकशीची मागणी

हरिजनटोली–हिरडामाली रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी पंचायत समिती सभापती चित्रलेखा चौधरी यांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. मात्र, दोन्ही रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता त्यांनी या प्रकरणाची गंभीर प्रत्येकी १० लाख रुपयांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, या कामांची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

डांबरीकरण आणि सिमेंटीकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करा!

जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या १० लाख रुपयांच्या डांबरीकरणाच्या कामाची तसेच ग्रामपंचायत सळख योजनेंतर्गत करण्यात आलेल्या १० लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची स्वतंत्रपणे तांत्रिक तपासणी करण्यात यावी. बांधकामात वापरण्यात आलेले साहित्य, कामाचा दर्जा, मंजूर अंदाजपत्रक, प्रत्यक्ष खर्च आणि कामाची गुणवत्ता यांची सखोल पडताळणी करावी. तपासणीत अनियमितता किंवा निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच दोषपूर्ण कामाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी सभापती चित्रलेखा चौधरी यांनी केली आहे.

२० लाखांचा निधी खर्च; जबाबदारी निश्चित होणार का?

ग्रामीण विकासाच्या नावाखाली दोन स्वतंत्र कामांवर एकूण २० लाख रुपये खर्च होऊनही रस्त्यांची अशी अवस्था होत असेल, तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. सार्वजनिक निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचा दर्जा राखण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असताना काही महिन्यांतच रस्ते खराब होण्यामागचे नेमके कारण काय, हे चौकशीतून स्पष्ट होणे गरजेचे आहे. आता संबंधित विभाग या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करणार का, की ग्रामस्थांना याच उखडलेल्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

गोरेगांव तालुका प्रतिनिधि महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *