*खुमारी येथील जीर्ण व धोकादायक पुलाची दुरुस्ती कधी होणार?* *ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष*
कळमेश्वर तालुक्यातील खुमारी गावात गेल्या ३० वर्षांपासून जीर्ण झालेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिक व शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा पूल अपघाताला आमंत्रण देत असून, परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हा पूल खुमारी गावाला जोडणारा प्रमुख मार्ग असून, याच रस्त्यावरून श्मशान घाट, शेतशिवारे, रिलायन्स वेअरहाऊस तसेच कनियाडोल आणि सावनेरकडे जाणारी वाहतूक सुरू असते. या मार्गावरून दररोज हजारो मजूर, शेतकरी, नागरिक आणि गुराढोरांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र, पुलाची दुरवस्था झाली असून कोणतीही तटबंदी किंवा सुरक्षेची उपाययोजना नसल्याने नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. काही काळापूर्वी बाबाभाऊ कोडे यांच्या म्हशीचा रेडा पुलावरून खाली पडून दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
विशेष म्हणजे, गावात असलेल्या रिलायन्स वेअरहाऊसकडून ग्रामपंचायतीला मोठा कर (टॅक्स) मिळतो आणि सामान्य निधीतूनही दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होते. एवढा निधी उपलब्ध असतानाही या पुलावर किरकोळ डागडुजी किंवा काँक्रीट टाकण्याचे कामही केले जात नाही. वेअरहाऊस आणि इतर माध्यमातून येणाऱ्या कराच्या पैशातून नेमकी कोणती विकासकामे केली जातात, असा रोकडा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत.
भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी ग्रामपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी खुमारी येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
