अवकाळी पावसाचा धानपिकांना फटका; गोरेगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात*

*अवकाळी पावसाचा धानपिकांना फटका; गोरेगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात*

 

*दुष्काळी मदतीतून वगळल्यानंतर आता निसर्गाचा घाला; तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी*

 

गोरेगाव (तालुका प्रतिनिधी) :

गोरेगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. आधीच दुष्काळी मदतीच्या यादीतून तालुका वगळला गेल्याने शासकीय मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे नवे संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेने वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गोरेगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण धानपिकावरच अवलंबून आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठी मेहनत आणि खर्च करून पीक उभे केले होते. मात्र, ऐन कापणीच्या व महत्त्वाच्या टप्प्यावर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने तडाखा दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, शेतीसाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

दुष्काळी मदतीतून वगळले, आता अवकाळीचा फटका!

यापूर्वी राज्यात दुष्काळ जाहीर करताना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला नव्हता. परिणामी, तालुक्यातील अनेक शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिले. त्यातच आता अवकाळी पावसाने धानपिकांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन गोरेगाव तालुक्याचा नुकसानभरपाई व मदत योजनांमध्ये तात्काळ समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तातडीने पंचनामे करून थेट खात्यात मदत द्या!

कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष व वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. या प्रक्रियेत कोणताही विलंब न करता बाधित शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी आणि नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी गोरेगाव येथील मंडल अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. लक्ष्मण भगत, विश्वजित डोंगरे, गिरधारी बघेले, चित्रकला चौधरी, रामेश्वर महारवाडे, नरेंद्र रहांगडाले, काशिनाथ धेंढास्कर, विजय पारधी

यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गोरेगाव तालुका प्रतिनिधि महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *