महागाव/कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्यावर लाच मागणी व धमकीचे आरोप; पोलीस ठाण्यात तक्रार
यवतमाळ प्रतिनिधी –एस के शब्बीर
पंचायत समिती सभागृह दुरुस्तीच्या कामाच्या बिलासंदर्भात १० हजार रुपयांची मागणी करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत महागाव येथील शासकीय ठेकेदार अरबाजखान कयुमखान पठाण यांनी जि.प. बांधकाम उपविभाग महागाव येथील कनिष्ठ अभियंता प्रवीण मनोहरराव सलामे यांच्या विरोधात महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, पंचायत समिती सभागृह दुरुस्तीच्या विकासकामाचे बिल मंजूर करण्यासाठी सलामे यांनी १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास बिलातील रक्कम सुमारे अडीच लाख रुपयांनी कमी करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांनाही पैसे देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.तसेच १३ मार्च २०२६ रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान वारंवार फोन करून अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. याशिवाय खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही सुमारे महिनाभरापूर्वी संबंधित अधिकाऱ्याने कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला व्हिडिओ कॉलद्वारे तलवार दाखवून धमकी दिल्याचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.दरम्यान, महागाव येथे गेल्या जवळपास दहा वर्षांपासून प्रवीण सलामे कार्यरत असून विविध कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचाराचे आरोप वेळोवेळी समोर आले असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. घाणमुख येथील कामांमधील कथित गैरप्रकार, धारगाव येथील रस्त्याच्या कामासंदर्भातील तक्रारी तसेच वाकोडी येथील कामांमधील तफावत याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तरीदेखील त्यांची बदली न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिक स्तरावर काही कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष असल्याचे बोलले जात असून, संबंधित अधिकारी नेहमी मद्यधुंद अवस्थेत कामकाज करतात व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात, असेही आरोप काहींनी केले आहेत.या संदर्भात तक्रारदाराने जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्रतिलिपी पाठवून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
