अखेर सत्याचा विजय : खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांचे निलंबन मागे
नवी दिल्ली, दि. १७ मार्च २०२६ :
लोकसभा अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत यादवरावजी पडोळे यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले असून, नियम ३७४ अंतर्गत करण्यात आलेली कारवाई तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे हा निर्णय जाहीर करण्यात आला. यापूर्वी दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
सदर आदेश अजय कुमार सूद, संचालक, लोकसभा सचिवालय यांच्या स्वाक्षरीने जारी झाला असून, दि. १७ मार्च २०२६ पासून डॉ.पडोळे यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
निलंबनाच्या काळात डॉ. पडोळे यांनी शांत बसण्याऐवजी आक्रमक भूमिका घेत लोकसभेच्या पायऱ्यांवर दररोज बसून आंदोलन केले. विविध जनहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत सरकारला धारेवर धरले. विशेष म्हणजे, सभागृहाबाहेरूनही त्यांनी आपली लढाई सुरू ठेवत शेतकरी, बेरोजगारी, ओबीसी जनगणना, तसेच स्थानिक प्रश्न यांसारखे मुद्दे राष्ट्रीय पातळीवर मांडले.
दररोज चालणाऱ्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले होते. माध्यमांमध्येही या आंदोलनाची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात होती. त्यामुळे केंद्र सरकारवर सातत्याने दबाव निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, या सततच्या आंदोलनामुळे सरकारची प्रतिमा प्रभावित होत होती आणि त्यामुळेच सरकारला अखेर एक पाऊल मागे घेत निलंबन मागे घ्यावे लागले.
“सरकारला जनतेसमोर उत्तर द्यावे लागत होते. आंदोलनामुळे दररोज सरकारची अडचण वाढत होती, आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला,” अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
डॉ. पडोळे यांच्या या सातत्यपूर्ण लढ्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “अखेर सत्याचा विजय झाला” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांनी याला लोकशाहीच्या विजयाची नोंद म्हणून पाहिले आहे.
निलंबन मागे घेतल्यानंतर डॉ. पडोळे आता पुन्हा लोकसभेच्या कामकाजात सक्रिय होणार असून, प्रलंबित प्रश्न अधिक ठामपणे मांडण्याचा त्यांचा निर्धार आहे. आगामी अधिवेशनात ते अधिक आक्रमक भूमिकेत दिसतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे संसदीय परंपरा, विरोधी पक्षाची भूमिका आणि आंदोलनाची ताकद याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, डॉ. पडोळे यांचे आंदोलन हे आगामी काळात एक महत्त्वाचा राजकीय संदर्भ म्हणून पाहिले जात आहे.
भंडारा गोंदिया मतदार संघातील हा जनतेचा विश्वास आहे माझ्यावर त्यामुळे मी लढू शकलो. पुन्हा नव्याने उठून आक्रमक भूमिका आपल्याला न्याय देण्यासाठी घेईन असेही त्यांनी बोलतांना सांगितले.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
