पैनगंगा अवैध हातभट्टीवर LCB पथकांचा छापा फुलसावंगी शिवारात दोन दारू अड्डे उद्ध्वस्त
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर
३ हजार ६०० लिटर मोहसडवा नष्ट, १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
तालुका व जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत महागाव पोलीस ठाणे हद्दीतील फुलसावंगी शेतशिवारात मोठी कारवाई केली. पैनगंगा नदीकाठावर सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकून तब्बल ३ हजार ६०० लिटर मोहसडवा आणि ११० लिटर तयार गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, फुलसावंगी परिसरातील पैनगंगा नदीच्या पात्रालगत अवैधरित्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुसद-उमरखेड पथकाने पंचांसमक्ष दोन ठिकाणी छापेमारी केली. कारवाईदरम्यान १ लाख २६ हजार रुपये किमतीचा ३ हजार ६०० लिटर मोहसडवा तसेच ११ हजार रुपये किमतीची ११० लिटर तयार गावठी दारू आढळून आली.
प्रकरणी गणेश किशन बोरकर (वय २५, रा. फुलसावंगी) व नूर खान असलम खान (वय ५०, रा. फुलसावंगी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) व (फ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या मालापैकी नमुना तपासणीसाठी आवश्यक सॅम्पल राखून ठेवण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल पंचनामा करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद-उमरखेड एलसीबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
