कोळसा व राख वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ताडपत्री बंधनकारक; अन्यथा कठोर कारवाई

कोळसा व राख वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ताडपत्री बंधनकारक; अन्यथा कठोर कारवाई

 

धुळीच्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त

पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांचे वाहनधारकांना आवाहन

 

पारशिवनी ५ ऑगस्ट

 

पारशिवनी शहरातून तसेच परिसरातील मार्गांवरून मोठ्या प्रमाणात कोळसा व फ्लाय ॲश (राख) वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकची सतत ये-जा सुरू असते. मात्र अनेक ट्रक चालक व मालक ताडपत्री न बांधताच वाहतूक करत असल्याने कोळसा व राखेचे कण रस्त्यावर उडून मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण निर्माण होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, दुचाकीस्वार, पादचारी तसेच व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असून या गंभीर बाबीची दखल घेत पारशिवनीचे पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांनी सर्व ट्रक चालक व मालकांना तातडीचे आवाहन केले आहे.

पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांनी स्पष्ट केले की, कोळसा किंवा राख वाहून नेणाऱ्या प्रत्येक ट्रकवर ताडपत्री व्यवस्थित बांधणे बंधनकारक आहे. ताडपत्री न बांधल्यामुळे वाहतुकीदरम्यान कोळसा व राख रस्त्यावर सांडते. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो.

पारशिवनी शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ तसेच औद्योगिक भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिवस-रात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. या वाहनांमधून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील दुकानदार, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा धुळीमुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होत असल्याने अपघाताचा धोकाही वाढतो.

यापुढे ताडपत्री न बांधता कोळसा किंवा राख वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांनी दिला आहे. वाहतूक नियमांचे पालन करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व ट्रक चालक, मालक व वाहतूकदारांना केले आहे. दरम्यान, नागरिकांनीही अशा प्रकारची निष्काळजी वाहतूक आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हिंमत राठोड , पो.हवा. किशोर येलेकर , संदिप करनाके , आकाश झाडे , रामकृष्ण दखने , दिपक दिवटे उपस्थित होते.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे धुळीचे प्रदूषण कमी होऊन शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कन्हान शहर प्रतिनिधी – मनिषा दिलीप मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *