रेती तस्करांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! तहसीलदारांच्या नाकाखाली अवैध उपसा; महसूल विभाग झोपेत की मेहेरबान?
तुमसर :
तुमसर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने मोठी कारवाई करत दणका दिला आहे. मौजा डोंगरला ते खैरलांजी मार्गावर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली पकडून पोलिसांनी ८ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे तुमसर तहसील कार्यालयाचा ‘महसूल विभाग’ नेमका काय करतोय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पथक गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, डोंगरला परिसरात दोन व्यक्ती विनापरवाना रेतीची चोरी करताना आढळले. यात नरेंद्र भीमराव उईके (२३, रा. पिपरा) आणि रविंद्र घनश्याम पटले (३३, रा. डोंगरला) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून:
स्वराज कंपनीचा ७३५ FE निळा ट्रॅक्टर (किंमत ६.५० लाख)
ट्रॉली (किंमत १.५० लाख)
एक ब्रास रेती, लोखंडी फावडे आणि घमेले
असा एकूण ८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध बी.एन.एस. कलम ३०५ (ई) व ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महसूल विभाग सुस्त, पोलीसच ‘अॅक्शन मोड’मध्ये!
मुळात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्याची प्राथमिक जबाबदारी ही तहसीलदार आणि महसूल विभागाची असते. मात्र, तुमसर तालुक्यात महसूल विभागाचा कोणताही धाक उरला नसल्याचे चित्र आहे. तहसीलदार महोदयांच्या कार्यक्षेत्रात दिवसाढवळ्या रेतीची चोरी होत असताना, तहसीलदारांचे ‘भरारी पथक’ केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, आता जिल्हाधिकारी या प्रकरणी सुस्त बसलेल्या महसूल प्रशासनावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
