मोठा दणका: आर्थिक गैरव्यवहार व भ्रस्टाचार भोवला; अरोलीच्या सरपंचा ‘अपात्र’ घोषित!
अरोली ग्रामपंचायतीच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर जिल्हा प्रशासनाचा मोठा हातोडा!
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आर्थिक अनियमिततेच्या गंभीर आरोपांनंतर,अपर आयुक्त, नागपूर विभाग यांनी सरपंचांना तात्काळ प्रभावाने ‘अपात्र’ ठरविले आहे.या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांत सरपंचांचा थेट सहभाग असूनही नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.केवळ सरपंचच नव्हे,तर या प्रकरणात ग्रामपंचायत सचिवही दोषी आढळले असून,त्यांच्यावरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अरोलीच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांना पुढील कालावधीसाठी सरपंच पद धारण करण्यास पूर्णपणे अपात्र घोषित करण्यात आले आहे.
सरपंचांसोबतच आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असलेल्या ग्रामपंचायत सचिवांवर नियमानुसार कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांना निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे भ्रष्ट कारभाराला चाप बसणार असून,चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्या व पैश्यांची अफरातफर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागपूर प्रतिनिधी राहुल पानतावणे
