धडाकेबाज कारवाई: कारधा पोलिसांकडून अवैध मोहा सडवा जप्त; आरोपीच्या आवळल्या मुसक्या!
भंडारा:
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, कारधा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत ४८,००० रुपये किमतीचा अवैध मोहा सडवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मकरधोकडा येथे एका इसमाने मोठ्या प्रमाणात मोहा सडव्याचा साठा केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार राठोड आणि त्यांच्या पथकाने मकरधोकडा येथे सापळा रचून छापा टाकला.
या छाप्यात आरोपी नेहाल प्रकाश बंसोड (वय ३२ वर्ष) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत ६ प्लास्टिक पोत्यांमध्ये भरलेला एकूण २४० किलो सडवा मोहा आढळला. बाजारभावाप्रमाणे या मालाची किंमत ४८,००० रुपये इतकी आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कर्तव्यदक्षता आणि टीमवर्क:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक श्री. गोकुल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. राठोड व यांचे पथकाने अत्यंत चोखपणे पार पाडली.
कारधा पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारांना पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
