*उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथे* एमआरआय, सिटीस्कॅन मशीन व एक्सप्रेस विद्युत फिटर बसविण्याची मागणी; रुग्ण कल्याण समिती सदस्य रविराज डोळसे यांचे जिल्हाधिकारी, उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन.
उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथील रुग्णांना अधिक दर्जेदार व तातडीची आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रविराज डोळसे यांनी मा. जिल्हाधिकारी, हिंगोली, मा. उपसंचालक (आरोग्य सेवा) आणि मा. जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली यांना सविस्तर निवेदन सादर करून रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
निवेदनात उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथे तात्काळ एमआरआय मशीन, सिटीस्कॅन मशीन आणि एक्सप्रेस विद्युत फिटर बसविण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
वसमत हे तालुक्याचे प्रमुख आरोग्य केंद्र असून आजूबाजूच्या अनेक लहान-मोठ्या गावांतील रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र, सिटीस्कॅन व एमआरआय मशीन उपलब्ध नसल्यामुळे गंभीर जखमी व अपघातग्रस्त रुग्णांना इतर ठिकाणी रेफर करावे लागते. या विलंबामुळे काही वेळा रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, वसमत येथे ही यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यास गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळून मोठा दिलासा मिळेल, असे डोळसे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांना दोन ते तीन तास अंधारात थांबावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आली आहे. अलीकडेच सुरू झालेल्या डायलिसिस विभागालाही वारंवार वीजपुरवठ्याच्या अडचणींमुळे सेवा देताना अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
रुग्णालयातील आरोग्य सुविधा सक्षम करून आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी आणि सर्व समस्या तातडीने सोडवून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रविराज डोळसे यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
प्रतिनिधी सचिन घारपुरे
