मानेगाव येथे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून भाताच्या ‘श्री’ पद्धतीचे प्रात्यक्षिक
आमगाव :- स्थानिक मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय, हिराटोला येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत मानेगाव (ता. आमगाव, जि. गोंदिया) येथे भात पिकाच्या शास्त्रीय ‘श्री’ (SRI) पद्धतीचे प्रात्यक्षिक आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला. शेतकर्यांना ‘श्री’ पद्धतीचे महत्त्व, योग्य अंतर आणि त्यामुळे उत्पादनात होणारी वाढ याविषयी माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.मानेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. जीवनलाल राधेश्याम बोपचे यांच्या शेतात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ममता रहांगडाले, आरजू रहांगडाले, रिया शहारे, सानिया शहारे व विशाखा शेंडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.या प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थिनींनी रोपवाटिकेतील १२ ते १४ दिवसांची कोवळी रोपे काढून, दोरीच्या साहाय्याने ठरावीक अंतरावर ओळीत १-१ रोपाची लागवड कशी करावी, याचे थेट सादरीकरण शेतकाऱ्यांसमोर केले. तसेच बेसल डोस (खत व्यवस्थापन), पाणी व्यवस्थापन व तणनियंत्रण यांसंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थिनींनी स्थानिक शेतकाऱ्यांकडून संकलित केली. ‘श्री’ पद्धतीमुळे शास्त्रीय रीतीने भाताचे उत्पादन कसे वाढवता येते, याचे मोलाचे मार्गदर्शन या वेळी शेतकाऱ्यांना मिळाले.
गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
