निकृष्ट धान्य वितरणाचा संताप; स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यावर कारवाईची मागणी
गरीबांच्या अन्नसुरक्षेशी तडजोड असह्य; अधिकाऱ्यांच्या दालनात निकृष्ट धान्य फेकून तीव्र निषेध
उमरखेड, दि. २८ (
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) गरीब व गरजू नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट, किडयुक्त व अळी पडलेले धान्य वितरित करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव वानखेडे यांनी संबंधित धान्य थेट अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकून निषेध नोंदविला.
नागरिकांनी सांगितले की, रेशनच्या धान्यात सातत्याने किड, अळ्या व धूळमिश्रित धान्य आढळत असून, हे धान्य मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते. गरीबांच्या अन्नसुरक्षेशी खेळ करणाऱ्या अशा प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर विजयराव वानखेडे यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत अन्नपुरवठा अधिकारी अनिल महाजन यांची भेट घेतली. त्यांनी निकृष्ट धान्याचे प्रत्यक्ष नमुने अधिकाऱ्यांसमोर सादर करून संबंधित दुकानाची तात्काळ चौकशी करण्याची तसेच दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी ग्रामस्थांनीही आपल्या तक्रारी मांडत, अनेक वेळा निकृष्ट धान्याबाबत तोंडी व लेखी तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयात कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अन्नपुरवठा विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा उद्देश गरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे निकृष्ट धान्य वितरणाच्या तक्रारींकडे केवळ औपचारिकतेने न पाहता, संबंधित धान्याची गुणवत्ता, पुरवठा साखळी आणि वितरण प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याचीही गरज व्यक्त होत आहे.
तालुका प्रतिनिधि बबलू उर्फ मोहम्मद शेख संपर्क क्रमांक.9067934036
