केळवद येथील कमांडो सैनिक स्कूलच्या संचालकावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

केळवद येथील कमांडो सैनिक स्कूलच्या संचालकावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

 

 

केळवद (तालुका सावनेर):

केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘कमांडो आर्मी पोलीस करिअर ॲकॅडमी सैनिक स्कूल’ येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ॲकॅडमीचा संचालक हरीशचंद्र गोपीलालजी राणे (वय ३७ वर्षे, रा. महालक्ष्मी नगर, सावनेर) याच्याविरोधात केळवद पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी मागील चार महिन्यांपासून या ॲकॅडमीमध्ये इयत्ता ९ वी चे शिक्षण व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहे. जून २०२६ मध्ये रात्रीच्या सुमारास आरोपी हरीशचंद्र राणे याने विद्यार्थिनीला कार्यालयाच्या मागे बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले होते. याशिवाय ॲकॅडमीतील इतर अल्पवयीन विद्यार्थिनींनाही लाठी ड्रील दरम्यान व रात्रीच्या वेळी असभ्य मागणी करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे.

दिनांक १५/०८/२०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता ॲकॅडमी परिसरात आरोपीने पीडित विद्यार्थिनीला बोलावून तिच्या हातात आक्षेपार्ह मजकूर लिहिलेली चिठ्ठी दिली होती. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या विद्यार्थिनींनी एकत्र येत दिनांक १६/०८/२०२६ रोजी केळवद पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन करत तोंडी तक्रार नोंदवली.

या तक्रारीच्या आधारे केळवद पोलिसांनी आरोपी हरीशचंद्र राणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ७४, ७५, ७९ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात केळवद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *