लाखांदूर पोलिसांची धडक कारवाई!! शेतकऱ्यांचे पंप चोरणारी ३ जणांची टोळी गजाआड!!एकुण ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त!!
लाखांदूर:लाखांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतीचे मोटार पंप चोरून शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून तीन संशयितांना अटक केली. सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये फिरोज मुनवर अली (वय ३२, रा. देसाईगंज वडसा, जि. गडचिरोली, सध्या रा. लाखांदूर), अरुण गणपत दिघोरे (वय ४०, रा. चप्राड, लाखांदूर) आणि नवनाथ श्रीहरी भागडकर (वय ३३, रा. खैरीपट, लाखांदूर) यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर केलेल्या तपासात गुन्ह्यात वापरलेल्या ३ दुचाकी आणि २ मोटार पंप जप्त करण्यात आले.जप्त साहित्यामध्ये १० हजार रुपये किंमतीचा टॉर्क कंपनीचा १.५ एच.पी. ओपनवेल पंप आणि ७ हजार रुपयांचा लुबी कंपनीचा ३ एच.पी. जुना मोटार पंप समाविष्ट आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (MH 33 E 1969), बजाज प्लॅटिना (MH 36 J 4609) आणि आणखी एक काळ्या रंगाची हिरो होंडा (MH 35 OJ 1876) अशा एकूण ४० हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भालेराव व लाखांदूर पोलीस अंमलदारांनी केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
