तुमसर पोलिसांचा शहरात रूट मार्च; आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाऊलतुमसर
(भंडारा): आगामी सण आणि उत्सवांच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (२४ ऑगस्ट) भव्य रूट मार्च (पथसंचलन) काढण्यात आला. भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले होते.या रूट मार्चमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. शिवम विसापुरे आणि तुमसरचे ठाणेदार श्री. सुभाष बारसे यांनी स्वतः उपस्थित राहून नेतृत्व केले. या संचलनात तुमसर पोलीस स्टेशन आणि उपविभागातील एकूण १४ पोलीस अधिकारी, ११४ पोलीस कर्मचारी आणि आरसीपी (RCP) पथकाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रमुख मार्गांवरून संचलन आणि शांततेचे आवाहनहा रूट मार्च शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागातून काढण्यात आला. यादरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, शहरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर ‘कॉर्नर मीटिंग’ संपन्नरूट मार्च संपल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तुमसर येथील ‘येरली मोहल्ला’ भागात एक कॉर्नर मीटिंग (शांतता समिती बैठक) घेण्यात आली. या बैठकीला परिसरातील ४० ते ५० नागरिक उपस्थित होते.या बैठकीत आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. “सण शांततेत आणि सलोख्याने साजरा करावा; सोशल मीडिया किंवा इतर कुठेही आक्षेपार्ह विधाने करू नयेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी,” अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला आणि सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले.
“पोलीस प्रशासन
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. जर कोणीही शांतता भंग करण्याचा किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”— (तुमसर पोलीस निरीक्षक श्री. सुभाष बारसे)
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
