गोंडखैरी येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; जुगार खेळताना ३ जणांना पकडले, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंडखैरी येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; जुगार खेळताना ३ जणांना पकडले, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

 

 

कळमेश्वर:

नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा गोंडखैरी येथे धाड टाकून अवैधरीत्या ५२ पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ३ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह दुचाकी वाहने आणि भ्रमणध्वनी असा एकूण १ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींविरुद्ध कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, मौजा गोंडखैरी येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून छापा टाकला असता, तेथे काही इसम जुगार खेळताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ईरफान ईकबाल कुरेशी (वय ३४ वर्ष, रा. वार्ड क्रमांक ५, गोंडखैरी), मोहम्मद आलम शेख (वय ३८ वर्ष, रा. पुरपट्टी मेहबाग, प्रयागराज, उत्तर प्रदेश; सध्या मुक्काम हिंगणा, नागपूर) आणि सलिम ईकबाल कुरेशी (वय ३८ वर्ष, रा. वार्ड क्रमांक ५, गोंडखैरी) या तिघांना जागीच ताब्यात घेतले.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ ताशपत्ते, ८ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम, ३ भ्रमणध्वनी आणि २ दुचाकी वाहने असा एकूण १ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *