सेवा सहकार फाउंडेशनच्या ‘स्वातंत्र्य अमृत ‘निबंध स्पर्धा निकाल जाहीर

सेवा सहकार फाउंडेशनच्या ‘स्वातंत्र्य अमृत ‘निबंध स्पर्धा निकाल जाहीर

 

सगरोळी दि. ९

समाजसेवा, सहकार, पारदर्शकता आणि मूल्याधिष्ठित कार्यपद्धती या तत्त्वांवर कार्य करणाऱ्या सेवा सहकार फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्य अमृत ऑनलाइन निबंध स्पर्धा – २०२६’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. “स्वातंत्र्याचा उत्सव, संकल्प, कर्तव्य, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाचा” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेला विविध वयोगटांतील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सेवा सहकार फाउंडेशनचा विश्वास आहे की, समाजात शाश्वत परिवर्तन घडविण्यासाठी केवळ आर्थिक साधने पुरेशी नसून सचोटी, चारित्र्य, विश्वास आणि सेवाभाव या मूल्यांचीही तितकीच आवश्यकता आहे. याच उद्देशाने १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

प्रथम वयोगट : ८ ते १८ वर्षे

या गटासाठी ‘माझे कर्तव्य’, ‘चांगला नागरिक कसा असावा?’ आणि ‘माझी समाजाप्रती जबाबदारी’ हे विषय देण्यात आले होते.

या गटात अनन्या निलेश कदम, बदलापूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील, जळगाव यांनी द्वितीय, तर भाविक दत्तात्रय रातावे, कावकोळी, म्हसा-मुंबई यांनी तृतीय क्रमांक मिळविला. निसर्ग अनिकेत धडे, ठाणे आणि गौरी अनिल एकाडे, मालाड-मुंबई यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.

द्वितीय वयोगट : १८ ते ५५ वर्षे

या गटासाठी ‘राष्ट्रनिर्माणात माझे योगदान’, ‘समाजसेवा हीच खरी देशसेवा’ आणि ‘जबाबदार नागरिक म्हणून माझी भूमिका’ हे विषय देण्यात आले होते.

या गटात प्रज्ञा शशिकांत कांबळे, पुणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वासुदेव गोविंद बर्वे, सावंतवाडी यांनी द्वितीय, तर मंदार रामदास वेद, डोंबिवली यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विशाखा विश्वास पालव, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग आणि शाहरुख सिकंदर शेख, अंबरनाथ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.

तृतीय वयोगट : ५५ वर्षांवरील

या गटासाठी ‘पुढील पिढीकडून माझी अपेक्षा’, ‘अनुभवातून समाजाला माझा संदेश’ आणि ‘तरुणांची नीतीमूल्ये’ हे विषय देण्यात आले होते.

या गटात प्रज्ञा रत्नाकर मराठे, डोंबिवली यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रमोद मधुकर कुलकर्णी, ठाणे यांनी द्वितीय, तर ॲड.डाॅ.. प्रकाश चं. जोशी, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. श्री. राम परशुरामपंत जोशी, नांदेड आणि शर्मिली विनय गांगण, रत्नागिरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

“आम्ही व्यक्ती जोडत नाही, तर समाजहित, राष्ट्रहित आणि मानवतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारे सहप्रवासी जोडत आहोत,” या विचारातून सेवा सहकार फाउंडेशनने हा उपक्रम राबविला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या यशा बद्द्ल ॲड.डाॅ.प्रकाश जोशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *