कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या!रखडलेला पीक विमा त्वरित द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा*
*उमरखेड |* उमरखेड व महागाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेना व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यावर्षी बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. बियाणे, खत, औषधे, मजुरी व ट्रॅक्टरचा मोठा खर्च सहन करावा लागला. त्यातच मागील दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दांडी मारल्याने सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिके वाळून गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
भूमिहीन मजुरांना रोजगार व कोरडवाहू, बागायतदार शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तसेच रखडलेला पीक विमा त्वरित मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी करून वेळकाढूपणा करू नये. येत्या १५ दिवसांत कोरडा दुष्काळ जाहीर न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात उमरखेड-महागाव तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
यावेळी यवतमाळ-वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, संपर्कप्रमुख संतोष ठमके, विधानसभा अध्यक्ष गौतम नवसागरे, उपाध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, विजय वानखेडे, भीमराव खंदारे, संदीप राऊत, नंदू इटकरे, राजू आगिरे, विनोद इंगोले, राजकुमार खंदारे, सुरेश लोमटे, विशाल बर्डे, विलास नावडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
*उमरखेड तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख*
*संपर्क : 9067934036*
