मीरा धनराज कदम यांना धान फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली,धान फाउंडेशन , मदुराई (तामिळनाडू) या फाउंडेशनच्यावतीने सौ. मीराताई धनराज कदम यांना त्यांच्या सामाजिक आणि समुदायासाठीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कलंजीयम म्युच्युअल मुव्हमेंट कम्युनिटी अवॉर्ड प्रदान करण्यात येत आहे. तामिळनाडू राज्यातील धान फाउंडेशनने मीराताईंच्या या कार्याची विशेष दखल घेतली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे चार राज्यातून या पुरस्कारासाठी मीराताईंची निवड करण्यात आली आहे.
पुरस्काराचे वितरण 2 ऑक्टोबर 2026 रोजी मदुराई ( तमिळनाडू) येथे होणार आहे. पण मीरा कदम हा पुरस्कार हिंगोली येथील धान फाउंडेशनच्या कार्यक्रमात स्वीकारतील.
मागील अनेक वर्षापासून मीरा कदम या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले निराधार मुले तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. सेवासदन वसतिगृहाच्या माध्यमातून या लेकरांच्या भोजन निवास आणि शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
त्यांच्या वसतिगृहातील मुले डॉक्टर, इंजिनियर, महाराष्ट्र पोलीस ,बँकिंग, इत्यादी क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत.
साथ फाउंडेशन आणि लोकसहभागातून हे वसतिगृह चालवले जाते. या कामात त्यांचे पती धनराज कदम त्यांना पावलोपावली मदत करतात.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रबोधनाचे महान कार्य मीराताई मागील कित्येक वर्षापासून करत आहेत तसेच मुलींचे शिक्षण, महिलांचे आरोग्य, कुटुंबव्यवस्था, तरुण मुला-मुलींसाठी मार्गदर्शन मेळावे अशा विविध माध्यमातून त्यांचे समुपदेशनाचे कार्य सुरू आहे.
एकल महिलांसोबत हळदी कुंकवाचे कार्यक्रम त्या साजरे करतात तसेच प्रत्येक वर्षीची दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब दिव्यांग कुटुंबात तसेच सैनिक कुटुंबात साजरी करतात.
आपल्या आचार आणि विचारातून समाजासाठी आदर्श असे कार्य मीराताई धनराज कदम यांनी उभे केले आहे.
या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कार्याची बाहेर राज्यातील फाउंडेशनने दखल घेतली आणि विशेष म्हणजे चार राज्यातून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली ही अभिनंदनीयम गोष्ट आहे. मीराताईंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
