मोठी कारवाई: वडोदा पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने शोधले २० चोरीला गेलेले मोबाईल; मूळ मालकांना केले परत
मौदा :
वडोदा पोलीस स्टेशन अंतर्गत हरवलेले, गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले तब्बल २० मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले आहेत.
विशेष मोहिमेला यश
नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेत कन्हाण उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शशांत एन. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली, वडोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज गदादे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.
‘CEIR’ पोर्टलचा प्रभावी वापर
वडोदा पोलिसांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने या मोबाईलचा शोध घेतला. यासाठी केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी एकूण २० मोबाईल ट्रॅक करून जप्त केले.
दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी वडोदा पोलीस स्टेशन येथे एका कार्यक्रमादरम्यान सहा. पोलीस अधीक्षक श्री. शशांत एन. एम. यांच्या हस्ते हे सर्व २० मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या यशस्वी कारवाईनंतर नागपूर ग्रामीण पोलिसांतर्फे नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईल हँडसेट गहाळ झाल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी. तसेच, केंद्र सरकारच्या https://www.ceir.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन मोबाईलची माहिती भरून तक्रार नोंदवावी. या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यास तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेणे अधिक सोपे आणि जलद होते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
