आठवडी बाजारातील अतिक्रमणावर धडक कारवाई
कळमेश्वरमधील मटन मार्केट चौकातील वाहतूक कोंडी सुटली
कळमेश्वर, दि. २५ : कळमेश्वर शहरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी मटन मार्केट चौकात फळ विक्रेत्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण केले जात असल्याने तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी कळमेश्वर पोलिसांनी रविवारी (दि. २५) ‘ॲक्शन मोड’वर येत धडक कारवाई केली.
नागपूर रोड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलापासून मटन मार्केट चौकापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच आठवडी बाजाराच्या दिवशी फळ विक्रेते रस्त्यावर दुकाने लावत असल्यामुळे वाहनचालकांना तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तातडीने पावले उचलत रविवारी चौकात बॅरिकेड्स लावून फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईमुळे चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊन रस्ता मोकळा झाला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
प्रतिनिधि: (मिनल सिंगुरकर)
