फुलंब्रीत महिला अत्याचार प्रकरणाने खळबळ..!
डॉक्टरसह भाजप शहराध्यक्षाला अटक; २४ तासांत पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, ता. २२ : उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच संबंधित घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गंभीर आरोप असलेल्या प्रकरणात फुलंब्री पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात डॉक्टर रामदास महादू तरटे (वय ५४) आणि भाजपाचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम भागजी ढोके (वय ५४) या दोघांना गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे फुलंब्री शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी पीडित महिलेने फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फुलंब्री येथील समर्थ क्लिनिकमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या या महिलेने डोकेदुखीच्या उपचारासाठी औषधांच्या गोळ्या दिल्यानंतर गुंगीच्या अवस्थेत आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, संबंधित घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने आपली बदनामी झाल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक डॉ. सोनाली पाईकराव, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे तसेच पोलीस अंमलदार अनिल शिंदे, दिनकर पांढरे आणि कौतिक चव्हाण यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
….
दोघांविरुद्ध समान कलमांनुसार गुन्हा
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर रामदास महादू तरटे आणि उत्तम भागजी ढोके या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६४(१), ६४(२)(ई), ६४(२)(एम), २९६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६७, ६७(अ) आणि ६६(ई), तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील संबंधित कलमांनुसारही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींविरुद्ध समान कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
……
पोलीस अधीक्षकांकडून गंभीर दखल
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.
…..
पूजा नागरे यांच्याकडे तपासाची जबाबदारी
या प्रकरणाचा पुढील तपास छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे करीत आहेत. तपासादरम्यान घटनेशी संबंधित पुरावे, डिजिटल स्वरूपातील माहिती आणि इतर अनुषंगिक बाबींची नियमानुसार पडताळणी करण्यात येत आहे.
….
