वर्धा-बुटीबोरी मार्गापासून राजस्थानी ढाब्यापर्यंत पसरलेले अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त, 39.25 लाखांच्या मुद्देमालासह 3 आरोपींना अटक
नागपूर: नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि बोरी पोलिसांनी आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीविरुद्ध मोठी कारवाई करत राजस्थानच्या 3 आरोपींना अटक केली आहे. 10 आणि 11 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय संयुक्त कारवाईत पोलिसांनी 28,65,520 रुपये किमतीचा 143 किलो 283 ग्रॅम डोडा पावडर आणि वाहनासह एकूण 39,25,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर 2026 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक आणि बोरी पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, वर्धा-बुटीबोरी मार्गावरील हळदगाव बस थांब्याजवळ एक संशयित महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक आरजे-21-जीएफ-2642 आढळून आले. पंचांसमक्ष वाहनचालक महेंद्र झुमरराम खदाव, वय 25 वर्षे, राहणार पालडी रणावता, तालुका भोपालगढ, जिल्हा जोधपूर, राजस्थान याची झडती घेतली असता अफूच्या बोंडापासून तयार केलेला 1,123 ग्रॅम डोडा पावडर मिळून आला, ज्याची किंमत 22,500 रुपये आहे. पोलिसांनी अमली पदार्थासह 10,00,000 रुपये किमतीचे बोलेरो वाहन आणि 5,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 10,27,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क, 15 ब आणि 29 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपीकडे केलेल्या सखोल तपासात तस्करीची बॅकवर्ड लिंक उघड झाली. आरोपीने हा अमली पदार्थ वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील चौधरी राजस्थानी ढाब्याचा मालक पप्पू चौधरी याच्याकडून विकत घेतल्याचे आणि मोबाईलवरील यूपीआय ॲपद्वारे ऑनलाईन पैसे दिल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने 11 नोव्हेंबर 2026 रोजी कारंजा घाडगे येथील संबंधित ढाब्यावर छापा टाकला. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये ढाब्यातून 28,43,020 रुपये किमतीचा 142 किलो 151 ग्रॅम डोडा पावडर जप्त करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून ढाबा मालक पप्पू मोडाराम चौधरी, वय 35 वर्षे, राहणार कामनई, तालुका सीनधरी, जिल्हा बालोतरा, राजस्थान आणि त्याचा सहकारी आचारी हडमानराम चिमाणराम सारण, वय 30 वर्षे, राहणार खारा, तालुका सीनधरी, जिल्हा बालोतरा, राजस्थान, दोघेही सध्या राहणार चौधरी राजस्थानी ढाबा, कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून अमली पदार्थाव्यतिरिक्त 25,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 22,000 रुपये किमतीचे एक मिक्सर मशीन, 5,500 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व कॅल्क्युलेटर आणि 2,600 रुपये रोख रक्कम असा एकूण 28,98,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या कारवाई पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, सहायक पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन लाकडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे, पोलीस हवालदार प्रकाश ठोके, नायक पोलीस शिपाई अमोल नागरे, पोलीस शिपाई अनिल खरडखेले, चालक पोलीस शिपाई अविनाश तोडसाम, सहायक पोलीस निरीक्षक विजय चनोर, सहायक फौजदार मिलिंद नांदुरकर, पोलीस हवालदार आशिष टेकाम, पोलीस हवालदार प्रमोद भोयर, पोलीस शिपाई सम्राट वनस्पती आणि पोलीस शिपाई राकेश तलेवार यांचा समावेश होता. तसेच बुटीबोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कुणाल ठाकुर, पोलीस हवालदार कुणाल पारधी, चालक पोलीस शिपाई गुणवंता डाखोळे, कोंढाळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तांदूळकर, पोलीस शिपाई विवेक, पोलीस हवालदार सतीश राठोड आणि सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस या टोळीतील इतर आरोपींचा तसेच तस्करीच्या बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकचा संयुक्तपणे तपास करत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
