अजिंठा लेणीचे अभ्यासू मार्गदर्शक शेख रहीम आणि त्यांचे बंधू शेख हमीद यांच्या निधनाने आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून शोकसंवेदना
तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
अजिंठा लेणीची माहिती देण्यासाठी १५ भाषा अवगत असलेले शेख रहीम यांचे निधन; फर्दापूर येथे निवासस्थानी भेट देऊन केले सांत्वन
**:फर्दापूर** अजिंठा लेणी येथे पर्यटकांना मार्गदर्शन करणारे, विविध भाषांवर प्रभुत्व असलेले आणि अजिंठा लेणीचा सखोल अभ्यास असलेले शेख रहीम शेख रशीद तसेच त्यांचे बंधू शेख हमीद शेख रशीद यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. या दोन्ही बंधूंच्या निधनाची माहिती मिळताच माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी अर्धापूर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले व आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
शेख रहीम शेख रशीद हे अजिंठा लेणी येथे अनेक वर्षांपासून पर्यटकांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत होते. अजिंठा लेणीचा इतिहास, तेथील शिल्पकला, चित्रकला आणि ऐतिहासिक वारसा यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. विशेष म्हणजे त्यांना सुमारे १५ भाषा अवगत होत्या. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांशी ते त्यांच्या भाषेत संवाद साधत अजिंठा लेणीची माहिती अतिशय प्रभावीपणे देत असत. आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे त्यांनी देश-विदेशातील पर्यटकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा मोठा मित्रपरिवारही होता.
दरम्यान, शनिवारी सकाळी शेख रहीम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या धाकट्या भावाच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे मोठे बंधू शेख हमीद यांनाही तीव्र धक्का बसला आणि त्यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने फर्दापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही दिवंगत बंधूंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शेख रहीम यांच्या निधनाने अजिंठा लेणीचा अभ्यास असलेला, विविध भाषांमधून जगभरातील पर्यटकांना आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारा एक अभ्यासू मार्गदर्शक आपण गमावला आहे. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची नेहमीच आठवण राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर (आबा ) काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, सोयगाव नगरपंचायतीतील शिवसेना गटनेते अक्षय काळे, विलास वराडे, शेख जाकेर, सिल्लोडचे माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, मकसूद कादरी, शेख हमीद, शेख इरफान, शेख शौकत, विजय तायडे आदींसह शोकाकुल परिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
