*कायद्याची जबाबदारी ज्यांच्यावर, तेच संशयाच्या भोवऱ्यात? गोरेगाव तहसीलमध्ये चर्चांचा भडका

*कायद्याची जबाबदारी ज्यांच्यावर, तेच संशयाच्या भोवऱ्यात?

गोरेगाव तहसीलमध्ये चर्चांचा भडका*

 

गोरेगाव तहसीलच्या अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून काही अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. सायंकाळच्या सुमारास घडत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या काही कथित घटनांमुळे नागरिकांमध्ये कुजबुज वाढली असून, “हे अधिकारी कायद्याचे रक्षक आहेत की अधिकाराचा गैरवापर करणारे?” असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.

 

गोरेगाव शहरात सध्या एक चर्चा विशेषत्वाने ऐकू येत आहे. सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, आपल्याच मोहल्ल्यातील एका महिलेसोबत एक पोलीस अधिकारी आढळून आल्याची चर्चा आहे. हा पोलीस अधिकारी नेमका कोण, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, यापूर्वी गोरेगाव पोलीस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात एका चर्चित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली होती व त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली होती, अशी आठवण नागरिक करून देत आहेत.

 

जर समाजात अशा स्वरूपाची कृत्ये घडत असतील आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस अधिकारीच महिलांशी कथित गैरवर्तणूक करत असतील, तर अशा प्रकारांवर आळा घालणार तरी कोण?

तो अधिकारी कोण आहे?

त्याच्यावर काही कारवाई झाली आहे काय?

पीडित कुटुंबाने भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही का?

पोलीस प्रशासनाची मदत का घेण्यात आली नाही?

या घटनेमुळे संबंधित महिलेच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला असेल, तर त्याला जबाबदार कोण?

 

तिच्या वैवाहिक व कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार?

असे अनेक गंभीर प्रश्न सध्या गोरेगाव तहसीलमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

ज्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्था, नैतिकता आणि प्रशासनाची मोठी जबाबदारी असते, त्यांच्याच नावाभोवती संशयाची वलयं तयार होत असल्याने संपूर्ण तहसीलमध्ये वेगळाच माहोल निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी गोरेगाव तहसीलमध्ये पदस्थ असलेल्या एका अधिकाऱ्याशी संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती आणि ते प्रकरण माध्यमांमध्येही चर्चेचा विषय ठरले होते.

 

अशा परिस्थितीत समाजात बलात्कार, खून, मारहाण, गुंडगिरीसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडत असताना, त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी जर नैतिकतेच्या कसोटीवर अपयशी ठरत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तहसीलमधील एक चर्चित अधिकारी अलीकडेच एका खासगी ठिकाणी दिसून आल्याची चर्चा आहे. त्यांच्या उपस्थितीनंतर काही संशयास्पद हालचाली झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्या ठिकाणी नेमके काय घडले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.

सूत्र असेही सांगतात की, या घटनेनंतर संबंधित कुटुंबात अंतर्गत चर्चा झाली. मात्र आजतागायत कोणतीही लेखी तक्रार, एफआयआर किंवा अधिकृत निवेदन दाखल झालेले नाही.

 

ही तक्रार का झाली नाही?

दबावाखाली निर्णय घेतला गेला का?

काही स्वरूपाचा समेट झाला का?

की आर्थिक व्यवहारांमुळे हे प्रकरण दडपले गेले?

असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत.

 

काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे प्रशासन अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असल्याचा संदेश गेला होता.

 

तरीदेखील गोरेगाव तहसीलमध्ये एका विशिष्ट अधिकाऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पुरावा समोर आलेला नसल्याने हे प्रकरण चर्चेपुरतेच मर्यादित आहे की यामागे काही गंभीर सत्य दडले आहे, हे येणारा काळच स्पष्ट करेल.

 

लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारणे हा नागरिकांचा हक्क आहे आणि प्रशासनातील पारदर्शकता टिकवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. गोरेगाव तहसीलमध्ये सुरू असलेल्या या चर्चांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

 

गोरेगांव तालुका प्रतिनिधि महादेव शेंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *