112 या आपत्कालीग वर खोटी माहिती व दिशाभूल करणारा पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अटक

112 या आपत्कालीग वर खोटी माहिती व दिशाभूल करणारा पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अटक

 

 

 

प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

 

 

 

‘डायल ११२’वर खोटी माहिती, पोलिसांची दिशाभूल करणारा अखेर पडला महागात दारूच्या नशेत आपत्कालीन ‘डायल ११२’ सेवेला वारंवार फोन करून भांडण सुरू असल्याची खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका इसमाचा ‘उद्योग’ अखेर त्यालाच महागात पडला. या प्रकरणी गजानन रामदास राठोड (रा. बजरंगनगर, ता. पुसद) याच्याविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भवानीनगर, बान्सी (ता. पुसद) येथून मोबाईल क्रमांक ९९२१३३१७३२ वरून ‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवेवर वारंवार फोन करून भवानीनगर परिसरात भांडण सुरू असल्याची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डायल ११२ पथकातील पोलीस अंमलदार हनुमान चव्हाण, पोहेकॉ संदेश पवार व पोउपनि विलास बहादुरे यांनी तातडीने शासकीय वाहनाने घटनास्थळी धाव घेतली.

 

मात्र भवानीनगर येथे पोहोचल्यानंतर स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता त्या ठिकाणी कोणताही वाद किंवा भांडणाचा प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो इसम कधी मोबाईल बंद करत होता, तर कधी ‘मी बान्सीत आहे’, ‘मी पुसदमध्ये आहे’ असे सांगत पोलिसांना वेगवेगळी ठिकाणे दाखवत फिरवत असल्याचे समोर आले

.

दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता गावातील चौकात एक इसम ‘मी डायल ११२ वर फोन करून पोलिसांना कसे फिरवतो’ अशी बढाई मारत असल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपले नाव गजानन रामदास राठोड (रा. बजरंगनगर, ता. पुसद) असे सांगितले.

 

या प्रकारामुळे खऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अंमलदार हनुमान चव्हाण यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २१७ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आपत्कालीन सेवा ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी असताना काहीजण दारूच्या नशेत अशा सेवांचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे प्रकार अधूनमधून समोर येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *