गॅस सिलेंडर तुटवडा, महागात विक्रीवर लगाम

गॅस सिलेंडर तुटवडा, महागात विक्रीवर लगाम

 

पुरवठा विभागाची धडक कार्यवाही; १३ भरलेले सिलेंडर जप्त

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर

 

महागांव, हिवरा, धनोडा, गुंज परिसरासह विविध हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय व बार-रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर पुरवठा विभागाने धडक कारवाई करत एकूण १३ भरलेले सिलेंडर जप्त केले. या कारवाईमुळे अवैध साठा व महागात विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अलीकडे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण करून त्यांची व्यावसायिक वापरासाठी व जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल व पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापेमारी करत विविध ठिकाणी तपासणी केली.

या पथकात परिवक्षाधीन तहसीलदार श्री. रोहित शिंदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे, नायब तहसीलदार व्हि. व्हि. पवार, गोदाम व्यवस्थापक राम बनसोडे तसेच लिपिक लखन चव्हान यांचा समावेश होता. पथकाने नियमानुसार तपासणी करत अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेले व वापरात असलेले १३ भरलेले सिलेंडर जप्त केले.

अधिकाऱ्यांनी संबंधितांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनीही गॅस सिलेंडरचा गैरवापर किंवा काळाबाजार आढळल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या धडक कारवाईमुळे गॅस सिलेंडरच्या कृत्रिम तुटवड्यावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *