कनिष्ठ अभियंतावर परत गंभीर आरोप; बडतर्फीची मागणी, अन्यथा जि. प. यवतमाळ येथे आमरण उपोषणाचा इशारा
यवतमाळ प्रतिनिधी एस. के शब्बीर
महागाव पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांनी केलेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या चौकशीत सलामे हे अनेक प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याचा आरोप पुढे आला आहे. खोट्या सह्या करून बिले काढणे, रस्त्यांच्या कामांचे लोकेशन बदलून इतर ठिकाणचे फोटो जोडणे,अधिकारक्षेत्रात नसलेल्या कामांमध्ये हस्तक्षेप करणे तसेच बोगस व बनवाट बिले काढणे असे गंभीर प्रकार समोर आल्याचे सांगितले जात आहे.याशिवाय, तालुक्यातील इतर अभियंत्यांना धमकावून सर्व कामांवर स्वतःचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. सलामे यांच्या मुजोर वर्तनाबाबतही अनेक तक्रारी असून, एका कनिष्ठ अभियंत्याला तलवार दाखवून धाक दाखविल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. तसेच एका महिला कनिष्ठ अभियंत्याला थेट धमकी देऊन “उचल बांगडी” करण्याची सुद्धा धमकी दिल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली होती.सदर महिला अभियंत्याने पोलिसांत तक्रार न करता आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. या पत्रात सलामे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नमूद असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, या तक्रारीचा समावेश चौकशी अहवालात किंवा संबंधित नोंदींमध्ये (१ ते ४ प्रकरणांमध्ये) दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या तक्रारीचीही वरिष्ट अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरून बसली आहे.घानमुख येथील सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांनी प्रवीण सलामे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केवळ निलंबन ही अपुरी कारवाई ठरेल, असे सांगत त्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. जर जिल्हा परिषद स्तरावरून कठोर कारवाई झाली नाही, तर लवकरच जिल्हा परिषद यवतमाळ येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.या प्रकरणामुळे महागाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून नेमकी कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
