मोहाडी पोलिसांचा वाळू माफियांना दणका; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, पण महसूल विभाग गाफील का?

मोहाडी पोलिसांचा वाळू माफियांना दणका; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, पण महसूल विभाग गाफील का?

 

मोहाडी – :

मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रोहा परिसरातून बेकायदेशीरपणे रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर जप्त करून पोलिसांनी सुमारे ६ लाख ६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, पोलिसांच्या या सक्रियतेनंतर आता ‘तहसील कार्यालय’ झोपेत आहे की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मोहाडी पोलिसांनी मौजा रोहा येथे सापळा रचून दोन पंचांसमक्ष ट्रॅक्टरची तपासणी केली. यावेळी आरोपी मोहित माधोकरी झेलकर (२३ वर्ष, रा. रोहा) हा विनापरवाना १ ब्रास रेतीची वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी खालील साहित्य जप्त केले आहे:

 

सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली: किंमत ६,००,०००/- रुपये.अवैध रेती:एक ब्रास अंदाजे ६,०००/- रुपये.घमेले व फावडे किंमत १००/- रुपये असा एकूण सहा लाख सहा हजार 100/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तहसील कार्यालयाला ‘घरचा आहेर’

 

एकीकडे पोलीस विभाग अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना, रेती चोरी रोखण्याची प्राथमिक जबाबदारी असलेले तहसील कार्यालय आणि त्यांचे भरारी पथक नक्की कुठे आहे? असा प्रश्न या कारवाईमुळे ऐरणीवर आला आहे.

१. दिवसाढवळ्या होणाऱ्या या चोरीची माहिती तहसीलच्या महसूल विभागाला का मिळत नाही?

२. केवळ पोलीसच का कारवाई करत आहेत? तहसील विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत का?

३. जप्त केलेल्या रेतीवर दंडात्मक कारवाई करून शासनाचा महसूल वसूल करण्यात तहसील कार्यालय पुढाकार घेणार का?

 

प्रशासनाचा वचक आवश्यक

 

पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, मोहाडी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. मात्र, जोपर्यंत महसूल विभाग आणि तहसील कार्यालय अशा माफियांवर कठोर आर्थिक दंड आणि कायमस्वरूपी बंदी घालत नाही, तोपर्यंत मोहाडी तालुक्यातील रेती चोरी थांबणे कठीण आहे.

 

आता या कारवाईनंतर तरी तहसीलदार मोहाडी आपल्या यंत्रणेला कामाला लावतात की वाळू माफियांना मोकळे रान मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *