पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा.
( महागाव तालुका पत्रकार संघाने तहसीलदार यांना दिले निवेदन
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर यवतमाळ जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध करत, महागाव तालुका पत्रकार संघाने तहसीलदार महागाव यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन ठाणेदारांवर निलंबन करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उमरखेड येथील ‘धाडस 007 न्यूज’ चॅनलचे पत्रकार अमित देशमुख यांनी उमरखेड तालुक्यातील अवैध धंद्यांचे पितळ पुराव्यासह उघडे पाडले होते. या बातम्यांमुळे संतप्त झालेल्या ठाणेदार शंकर पांचाळ यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत पत्रकार देशमुख यांच्यावर आयपीसी ३५३ (सरकारी कामात अडथळा) व बीएनएस अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही कारवाई निव्वळ सूडबुद्धीने आणि अवैध धंदेवाल्यांना पाठबळ देण्यासाठी केल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे.
“जर पत्रकाराने खरोखरच सरकारी कामात अडथळा आणला असेल, तर त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तात्काळ सार्वजनिक करावे,” अशी मागणी पत्रकार संघाने करून सदर फुटेज समोर आल्यास ठाणेदारांचा खोटेपणा उघड होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. केवळ स्वतःचे अपयश झाकण्यासाठी एका पत्रकाराचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा संताप व्यक्त होत आहे. ठाणेदार शंकर पांचाळ यांना तातडीने निलंबित करून त्यांची सीआयडी चौकशी व्हावी, पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.,अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली..
या निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर दोषी ठाणेदारावर ठोस कारवाई झाली नाही, तर महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल. पत्रकारांच्या सन्मानाला धक्का लागल्यास निर्माण होणाऱ्या जनक्षोभाला पोलीस प्रशासनच जबाबदार असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदन नायब तहसीलदार गजानन पराते,पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांनी स्विकारले.
या निवेदनावर महागाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कामारकर,उपाध्यक्ष किरण नरवाडे,सचिव रमेश देशमुख,मार्गदर्शक रितेशभाऊ पुरोहित,माजी अध्यक्ष संतोष जाधव, रवि कावळे,संजय पाटे,विजय सुर्यवंशी,निलेश नरवाडे,विशाल डहाळे,शेरखान पठाण,संजय नरवाडे,अशोक राऊत ,विलास गावंडे यां सर्व पत्रकारांनी स्वाक्षऱ्या देऊन निवेदनातुन आमरण उपोषण होईल असा दिला इशारा
