तुमसरात अवैध रेती उत्खननाचा सुळसुळाट; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, मग तहसीलदार सुस्त का

तुमसरात अवैध रेती उत्खननाचा सुळसुळाट; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, मग तहसीलदार सुस्त का?तुमसर तहसीलदारांचे नियंत्रण सुटले?

 

तुमसर – :

तुमसर तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीने कळस गाठला असून, महसूल विभागाच्या नाकाखाली रेती माफिया मोकाट फिरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दि.७ मे २०२६ रोजी रविवारी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पोलीस पथकाने डोंगरला ते सितेपार रोडवर धाड टाकून ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईमुळे तुमसर तहसीलदार आणि महसूल विभागाच्या संशयास्पद भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पोलीस जागे, मग महसूल विभाग का सुस्त?

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा डोंगरला सितेपार फाट्याजवळ विनाक्रमांकाच्या हिरव्या रंगाच्या ‘जॉन डीअर ५१०५’ ट्रॅक्टरमधून विनापरवाना अवैध रेती वाहतूक केली जात होती. पोलिसांनी तत्परता दाखवत २५ वर्षीय आरोपी गिरीश पदम भगत याला रंगेहात पकडले. पोलिसांना अवैध रेतीची माहिती मिळते, मात्र संपूर्ण तालुक्याच्या खनिज संपत्तीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले तुमसर तहसीलदार आणि त्यांचे पथक याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 

शासकीय महसुलाचे नुकसान, तहसीलदारांचे दुर्लक्ष?

या कारवाईत ८ लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि अंदाजे ६ हजार रुपये किमतीची १ ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. तालुक्यात दररोज लाखो रुपयांच्या रेतीची चोरी होत असताना, महसूल विभागाकडून ठोस कारवाया का केल्या जात नाहीत? तहसीलदारांच्या आशिर्वादामुळेच रेती माफियांचे धाडस वाढले आहे का? अशी उघड चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. तुमसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (क्रमांक ७४४/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं.) नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईनंतर आता तुमसर तहसीलदार अवैध रेती घाटांवर आणि माफियांवर स्वतःहून काही मोठी कारवाई करणार की दरवेळी पोलिसांच्या कारवाईवरच अवलंबून राहणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *