पेरणीच्या उंबरठ्यावर ऊस उत्पादकांची नैचरल शुगरकडे आशेची टोक 

पेरणीच्या उंबरठ्यावर ऊस उत्पादकांची नैचरल शुगरकडे आशेची टोक

पिकविमा, कर्जमाफीची अपेक्षा फोल; अंतिम बिलानेच मिळणार आर्थिक दिलासा

 

 

 

 

प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

 

 

मागील वर्षभरापासून आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणारा ऊस उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडला आहे. पिकविमा, कर्जमाफी, नवीन पीककर्ज आणि प्रोत्साहन अनुदानाच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने आता हजारो शेतकऱ्यांची नजर नैचरल शुगर कारखान्याकडून मिळणाऱ्या अंतिम देयकावर लागली आहे.

गेल्या वर्षी पिकविम्याची रक्कम मिळेल, या आशेवर अनेक शेतकरी खत, बियाणे आणि शेतीच्या इतर नियोजनाची वाट पाहत होते. मात्र अपेक्षित लाभ न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशाच आली. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पिकविम्याचे वितरण झाल्याच्या बातम्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेमुळे काही काळ आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा न झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.त्यानंतर कर्जमाफी, नवीन पीककर्ज आणि प्रोत्साहन अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु विविध अटी, निकष आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे या योजनांचाही लाभ अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकला नाही.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा विश्वास आता नैचरल शुगर कारखान्यावर टिकून आहे. कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने गेल्या दहा हंगामांमध्ये जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ऊस उत्पादकांना अंतिम देयक वेळेत अदा केले आहे. त्यामुळे यंदाही १५ जूनपर्यंत अंतिम बिल मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

कारखाना व्यवस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यांनीही १५ जूनपर्यंत अंतिम बिलाचे धनादेश वितरित करण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, मृग नक्षत्राचा पाऊस अद्याप सुरू न झाल्याने आणि संभाव्य दुष्काळाच्या चर्चेमुळे बळीराजा आर्थिक व मानसिक तणावाखाली आहे. पेरणीची तयारी पूर्ण असली तरी आवश्यक निधीअभावी अनेक शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत.

शेतकरी गोविंदराव देशमुख (सवनेकर) यांनी नैचरल शुगरने १५ जूनपर्यंत समाधानकारक अंतिम बिल अदा केल्यास पेरणीसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळेल आणि हजारो ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *