गुंज येथे 52 पत्ता जुगार अड्डा उद्ध्वस्त; 7 जण ताब्यात, ₹55,960 चा मुद्देमाल जप्त
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर
महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गुंज येथे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या 52 पत्ता जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), यवतमाळ पथकाने शनिवारी (13 जून) धडक कारवाई करत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम, जुगार साहित्य व मोबाईलसह एकूण ₹55 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मौजे गुंज येथील श्रीधर पुंजाराव जोरोळे यांच्या कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही व्यक्ती पैशांची हार-जीत लावून 52 पत्ता जुगार खेळत असल्याची खात्री मिळाली
यानंतर एलसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान निरंजन नागोराव यादव, श्रीधर पुंजाराव जोरोळे, संतोष किसन राठोड, नागोराव विठ्ठल दुपारे, दिगांबर दत्तात्रय आसोले, राजेंद्र पांडुरंग कांबळे आणि सुशील भगवान अखाडे यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून रोख रक्कम, 52 पत्त्यांचा संच, जुगारासाठी वापरलेले साहित्य तसेच मोबाईल फोन असा एकूण ₹55,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
