सैनिकरत्न पुरस्कार’ प्रदान; नांदेडचे सेवानिवृत्त कॅप्टन प्रकाश कस्तुरे यांचा गौरव

‘सैनिकरत्न पुरस्कार’ प्रदान; नांदेडचे सेवानिवृत्त कॅप्टन प्रकाश कस्तुरे यांचा गौरव

 

नांदेड प्रतिनिधी :

देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करून भारतीय सैन्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे नांदेड येथील सेवानिवृत्त कॅप्टन प्रकाश कस्तुरे यांना सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात प्रतिष्ठेचा ‘सैनिकरत्न पुरस्कार’ दि.२६ जूलै रोजी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

भारतीय सेनेतील प्रदीर्घ सेवाकाळात कॅप्टन प्रकाश कस्तूरे यांनी राष्ट्ररक्षणासाठी दिलेले मोलाचे योगदान, शौर्य, शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव होताच उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ब्रिगेडियर सुधीर सावंत (माजी खासदार), तथा अध्यक्ष ,सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. राज्यभरातील माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

कॅप्टन प्रकाश कस्तुरे यांना मिळालेला हा बहुमान नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचा राष्ट्रसेवेचा सन्मान म्हणजे देशरक्षणासाठी झटणाऱ्या प्रत्येक सैनिकाला दिलेली आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *