📢 गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत शेळीची चोरी; २५ हजारांचा ‘ब्लॅक बंगाल’ बोकड लंपास!
गोरेगाव (गोंदिया):
शेतशिवारातून पशुधनाची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकऱ्याचा २५ हजार रुपये किमतीचा महागडा बोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लिंबा येथील रहिवासी फिर्यादी प्रदिप अच्युतराव पत्की (वय ७१ वर्ष) यांचे लिंबा शेतशिवारात शेड आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी आपल्या शेळ्या-मेंढ्यांना चारा-पाणी देऊन शेडमध्ये सुरक्षित बांधून ठेवले होते. त्यानंतर ते आपल्या नोकरासह पोल्ट्री फार्ममध्ये झोपण्यासाठी गेले.
🐐 २५ हजारांचा बोकड चोरीला
२४ जुलै २०२६ च्या पहाटे ५:०० वाजताच्या सुमारास फिर्यादी पत्की हे झोपेतून उठले आणि शेडकडे गेले. त्यावेळी त्यांना शेडमध्ये बांधलेला ‘ब्लॅक बंगाल’ (Black Bengal) जातीचा, काळ्या रंगाचा बोकड गायब असल्याचे दिसून आले. चोरांनी रात्री १०:०० ते पहाटे ५:०० वाजेच्या दरम्यान संधी साधून हा बोकड लंपास केला. या बोकडाची किंमत अंदाजे २५,००० रुपये आहे.
आपला मौल्यवान बोकड चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तोंडी तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ४७८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मपोनी वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस हवालदार खेमराज कोडापे (बकल नं. १५५१) या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, अज्ञात चोराचा शोध सुरू आहे.
गोरेगांव तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे
