उमरखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस, ९० टक्के मुद्देमाल जप्त

उमरखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस, ९० टक्के मुद्देमाल जप्त

 

तीन आरोपी जेरबंद; ₹७४,५०० किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत

 

 

उमरखेड :

उमरखेड शहरात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांचा यशस्वी छडा लावत उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, चोरीस गेलेल्या सुमारे ९० टक्के मुद्देमालासह एकूण ₹७४,५०० किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात आणि डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलवली. मिळालेल्या माहितीनुसार गावडे कॉलेज परिसरातील ठाणकी रोड येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

 

चौकशीदरम्यान आरोपींनी उमरखेड शहरातील विविध भागांतील चहा टपऱ्या, बंद दुकाने तसेच एका घरात घरफोडी करून गॅस शेगड्या, गॅस सिलिंडर, होम थिएटर, रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त केले.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद समीर सय्यद करीम (२२), शेख रेहमान शेख रहीम (२१) आणि सुशांत किशोर चाफेकर (२०) या तिघांचा समावेश असून, ते सर्व उमरखेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरें, सहाय्यक फौजदार विजय पंतगे, पोलीस हवालदार चंदन जाधव, जय राठोड तसेच पोलीस कर्मचारी संभाजी टेंभरे, विष्णू राठोड, प्रफुल्ल घुसे, निवृत्ती म्हाळणकर आणि राजू मेटकर यांनी विशेष परिश्रम घेत ही कारवाई यशस्वी केली.

 

घरफोडीच्या घटनांचा अल्पावधीत छडा लावून आरोपींना जेरबंद करत बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात उमरखेड पोलिसांना यश आल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या तत्पर व प्रभावी कामगिरीचे कौतुक करण्यात येत असून, या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांवर प्रभावी अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

 

उमरखेड | तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख

संपर्क : 090679 34036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *