रामटेक पोलिसांची धडक कारवाई: लॉजिंगच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश; मुख्य आरोपी अटक, पीडितेची सुटका!

रामटेक पोलिसांची धडक कारवाई: लॉजिंगच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश; मुख्य आरोपी अटक, पीडितेची सुटका!

 

रामटेक:

लॉजिंग आणि रेस्टॉरंटच्या नावाखाली अवैधपणे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डयावर रामटेक पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.

 

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पडला छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘नेचर हिल्स लॉजिंग अँड रेस्टॉरंट’ (हिवरा रोड) येथे पैशांचे आमिष दाखवून महिला व मुलींकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतला जात असल्याची खात्रीशीर माहिती रामटेक पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही वेळ न गमावता घटनास्थळी तात्काळ धाड टाकली.

 

मुख्य सुत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी लॉजवर छापा टाकला असता, तिथे अवैधपणे कुंटणखाना चालवणारा मुख्य आरोपी शुभम चंद्रभान ठाकूर (वय २५ वर्षे, रा. गांधी पुतळ्याजवळ, टाकडी भंसाळी, ता. सावनेर, जि. नागपूर) हा रंगेहात मिळून आला. चौकशी दरम्यान तो स्वतःच या लॉजचा मालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून या अनैतिक व्यवसायात ढकलत होता.

या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून:

०१ अँड्रॉइड मोबाईल फोन

१८९० रुपये रोख रक्कम

इतर साहित्यांसह एकूण १,२२,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपी शुभम ठाकूर विरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम (PITA) च्या कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *