स्थानिक गुन्हे शाखेची तत्पर कारवाई: जलालखेडा दरोडा प्रकरणी १० आरोपींना अटक, ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा रोहणा येथे शेतातील गोठ्यावर दरोडा टाकून ४५ मेंढ्या आणि १६ बकऱ्या लांबवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने पर्दाफाश केला आहे. ३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे आरोपींनी मारोतराव बांबल यांना बांधून ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि २,८९,००० रुपयांची जनावरे पळवून नेली होती. वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अंकुश माने व पथकाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपींना जेरबंद केले.
या कारवाईत १. संतोष रामसिंग चव्हाण (वय ३६ वर्षे, रा. आष्टी), २. देवेन्द्र उर्फ भुऱ्या राजेंद्र पवार (वय २९ वर्षे, रा. उमठा पारधी बेडा), ३. सतिश भोजणसिंग जाधव (वय २८ वर्षे, रा. रेडवा), ४. रोशन जुगल चव्हाण (वय २४ वर्षे, रा. रेडवा), ५. सोन्याजी शेरू पवार (वय १९ वर्षे, रा. उमठा), ६. पवन दाऱ्या पवार (वय २५ वर्षे, रा. उमठा), ७. लखन उर्फ लोकेश शेरू भोसले (वय १९ वर्षे, रा. उमठा), ८. वैभव विलासराव माहोरे (वय ३२ वर्षे, रा. आष्टी), ९. अंकुश उर्फ चेतन केशवराव पोकळ (वय ३५ वर्षे, रा. आष्टी) आणि १०. योगेश दशरथ सरोदे (वय २१ वर्षे, रा. साहूर) या १० आरोपींना अटक करण्यात आली असून ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही यात सहभाग निष्पन्न झाला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, हुंडाई आय-२० कार, होंडा युनिकॉर्न मोटारसायकल, ७ मोबाईल फोन आणि १,२५,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जलालखेडा पोलीस स्टेशनमधील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
