यशोधरा नगर पोलिसांची धडक कारवाई: 3 घरफोड्यांसह 5 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, कुख्यात पियुष उर्फ गधा जेरबंद* 

*यशोधरा नगर पोलिसांची धडक कारवाई: 3 घरफोड्यांसह 5 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, कुख्यात पियुष उर्फ गधा जेरबंद*

 

 

 

नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडक कारवाई करत घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला गजाआड केले आहे. या कारवाईमुळे 3 घरफोड्या आणि 5 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीच्या ताब्यातून 3,47,288 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पियुष उर्फ गधा दीपक निमजे (वय 20 वर्षे, रा. नाईक तलाव, बांगलादेश, पाचपावली, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट 2026 रोजी रात्री कुंदनलाल गुप्ता नगर येथील रहिवासी किशोर जागोबाजी निपाने यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान 3 सप्टेंबर 2026 रोजी यशोधरा नगर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना पियुष उर्फ गधा निमजे याने विविध भागांत घरफोडी आणि वाहन चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचवटी नगर मैदान परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवत सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.

चौकशीदरम्यान आरोपीने यशोधरा नगर, हुडकेश्वर, पारडी आणि शांतीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून घरफोडी व वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने चोरीचा मुद्देमाल ईटाभट्टी चौकातील विटांच्या भट्टीमागे लपवून ठेवला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीच्या सांगण्यावरून पांढऱ्या रंगाची पल्सर दुचाकी, काळ्या रंगाची एक्सट्रीम दुचाकी, ऍक्टिव्हा मोपेड, स्प्लेंडर दुचाकी अशा वाहनांसह चांदीची चैन, लहान मुलांचे चांदीचे कंबरबंद, चांदीची पायपट्टी, रोख रक्कम आणि धम्मदीप नगर येथील पानटपरीतून चोरलेली विविध कंपन्यांची सिगारेटची पाकिटे असा एकूण 3,47,288 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. तसेच शांतीनगर हद्दीतून साथीदार विक्की डेहरिया आणि विनोद उर्फ गट्टू लांजेवार यांच्या मदतीने चोरलेली रॉयल इन्फिल्ड बुलेट दुचाकीही या गुन्ह्यात निष्पन्न झाली आहे.

सदर आरोपी हा नेहमी टोळीने गुन्हे करणारा असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा, सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा नगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चाँद शेख, पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ नन्नावरे, अंमलदार गणेश गुप्ता, रवी अहीर, अमोल भेंडेकर, लक्ष्मण पडवाल, रितेश दुधे, अक्षय कुळसंगे आणि मंगेश गिरी यांनी केली आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *