कामठी पोलिसांची मोठी कारवाई: गादा शिवारात निर्दयतेने डांबलेले ११० गोवंश जप्त; सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कामठी (नागपूर):
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे डांबून ठेवलेल्या तब्बल ११० गोवंशीय बैलांवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १९ लाख १५ हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, शेतमालक मुश्ताक कुरेशी याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गादा ते नेरी मार्गावरील खसरा क्रमांक १८ मधील संशयित आरोपी मुश्ताक कुरेशी (रा. कामठी) याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर जनावरे आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता, तिथे चारा आणि पाण्याची कोणतीही सोय न करता ११० गोवंशीय बैल अत्यंत अमानुष आणि क्रूर पद्धतीने बांधून ठेवल्याचे उघडकीस आले. ही सर्व जनावरे कत्तलीच्या उद्देशानेच डांबून ठेवल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून सर्व ११० गोवंशीय जनावरे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या या जनावरांची अंदाजे किंमत १९ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपी मुश्ताक कुरेशीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा १९९५ चे कलम ५(ब), ९ सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(फ), (ह), (आय) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने जनावरे ताब्यात आल्यामुळे त्यांची तातडीने रवानगी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे सध्यातरी ही सर्व ११० जनावरे पोलीस आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली घटनास्थळीच सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
