तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या पोस्टरचे मुंबईत अनावरण
संतपरंपरेतील समता व मानवतेचा विचार आजही दिशादर्शक : हर्षवर्धन सपकाळ
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
मुंबई : महाराष्ट्राच्या संतपरंपरेने भक्तीच्या माध्यमातून समता, बंधुता आणि मानवतेचा विचार समाजमनात रुजविला. जातिभेदाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा संदेश देणारा हा विचार आजच्या काळातही समाजाला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र, आळंदी; वृंदावन फाऊंडेशन, पुणे–मुंबई आणि संत नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलना’च्या पोस्टरचे अनावरण मुंबईतील टिळक भवन येथे सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सपकाळ म्हणाले, ‘‘संत नामदेव महाराज आणि संत चोखामेळा महाराज यांच्या गुरु–शिष्य नात्यातून सामाजिक समतेचा व्यापक संदेश पुढे आला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेने भक्तीबरोबरच माणसामाणसांतील भेद नाकारून समता आणि मानवतेची मूल्ये रुजविली. संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.’’
ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनीही संतपरंपरेतील समतेच्या विचाराचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘‘वारकरी संतांनी अध्यात्माला केवळ कर्मकांडापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक समतेची जोड दिली. संत चोखामेळा महाराजांचे जीवन आणि अभंग हे उपेक्षित माणसाच्या आत्मसन्मानाचा आवाज आहेत. या विचारांचा समाजात सातत्याने जागर होणे आवश्यक आहे.’’
तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन दि. २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र नरसी नामदेव, जि. हिंगोली येथे होणार आहे. संतशिरोमणी नामदेव महाराज आणि संत चोखामेळा महाराज यांच्यातील गुरु–शिष्य नाते, त्यांच्यातील आत्मीय स्नेह तसेच भागवत–वारकरी परंपरेतील भक्ती, समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा जागर, ही संमेलनाची मध्यवर्ती भूमिका आहे.
या दोन दिवसीय संमेलनात साहित्य, संतसाहित्य, अध्यात्म, सामाजिक विचार आणि वारकरी परंपरेतील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे विचारवंत, साहित्यिक, संतसाहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मांदियाळी जमणार आहे. संमेलन अधिक आशयघन आणि व्यापक होण्यासाठी नागरिक, अभ्यासक व रसिकांनी आपल्या सूचना आणि संकल्पना संमेलन समितीकडे कळवाव्यात, असे आवाहन प्रा. अलका सपकाळ यांनी केले आहे.
याप्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक तथा संतसाहित्याचे अभ्यासक सचिन पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन, धनंजय शिंदे, नाट्य व चित्रपटसृष्टीतील अभिनेते तथा संहितालेखक कल्याण पाटील आणि निखिल मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
