दि.२८/०७/२०२६
दिल्ली आज दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांची सदिच्छा भेट घेऊन ग्रामीण भागातील क्रीडा विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना आवश्यक सुविधा, दर्जेदार क्रीडा मैदान, आधुनिक प्रशिक्षण केंद्रे, प्रशिक्षित प्रशिक्षक आणि अत्याधुनिक क्रीडा साहित्य यांच्या अभावामुळे आपल्या गुणवत्तेला योग्य न्याय मिळत नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा मैदाने व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यास तेथील युवक-युवती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतील आणि भविष्यात ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू ग्रामीण मातीतून घडू शकतील, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.तसेच, ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, जिल्हास्तरावर आधुनिक क्रीडा संकुल, धावपट्टी, बहुउद्देशीय क्रीडा मैदाने, व्यायामशाळा तसेच खेळाडूंसाठी आवश्यक प्रशिक्षण व निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
याशिवाय मतदारसंघातील विविध विकासकामे, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविता येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
या प्रसंगी उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनरावजी वानखेडे,भाजपा जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा तसेच राजू पडगिलवार उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवकांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या मागणीस माननीय केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या बाबींचा निश्चितपणे विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली….. तालुका प्रतिनिधि बबलू उर्फ मोहम्मद शेख संपर्क .9067934036
