सावनेर तालुक्यात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर केळवद पोलिसांची कारवाई; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
केळवद
सावनेर तालुक्यातील बेलदारपुरा भागात विनापरवाना अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमाविरुद्ध केळवद पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी देशी दारू आणि दुचाकी असा एकूण ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एका दुचाकी वाहनावरून देशी दारूची अवैध वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने मौजा पंडित गणपत बमनोटे यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर, वॉर्ड क्रमांक ०१, बेलदारपुरा (ता. सावनेर) येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयित प्लेझर स्कूटी क्रमांक एम.एच.-४०/टी-६११७ येताना दिसली.
वाहनाला थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, गाडीच्या डिक्कीमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत देशी दारूच्या बाटल्या (निपा) आढळून आल्या. पोलिसांनी ४०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १० निपा तसेच ४० हजार रुपये किमतीची प्लेझर स्कूटी असा एकूण ४०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी पंडित गणपत बमनोटे (वय ७० वर्षे, रा. वॉर्ड क्र. ०१, बेलदारपुरा, ता. सावनेर, जि. नागपूर) याच्याविरुद्ध केळवद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
