उमरखेड पोलीसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; ए.टी.एम. कार्ड एक्सचेंज करून फसवणूक

उमरखेड पोलीसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; ए.टी.एम. कार्ड एक्सचेंज करून फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी मुंबईतून जेरबंद

 

गुन्ह्यातील १०० टक्के रक्कम २८,००० रुपये जप्त; एक महिन्यापूर्वीचा गुन्हा उघडकीस

 

उमरखेड, दि. २३ सप्टेंबर २०२६ :

उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत एक महिन्यापूर्वी ए.टी.एम. कार्ड एक्सचेंज करून पैसे लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत आरोपीला निष्पन्न करून मुंबई येथून गुन्ह्यातील १०० टक्के रक्कम जप्त करत गुन्हा उघडकीस आणण्यात उमरखेड डी.बी. पथकाला यश आले आहे.

 

दिनांक १९/०८/२०२६ रोजी सायंकाळी १८:११ वा. च्या दरम्यान फिर्यादी साईनाथ शेषराव शिंदे वय ५० वर्षे, रा. मोहननगर उमरखेड हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम. मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, ए.टी.एम. मधून पैसे निघत नसल्याने त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या इसमाने मदतीचा बहाणा करून त्यांच्याकडील ए.टी.एम. कार्ड स्वतःकडे घेऊन त्यांना दुसरे ए.टी.एम. देऊन पासवर्ड टाकण्यास सांगितले व सदर इसम फिर्यादीचे ए.टी.एम. कार्ड घेऊन तेथून निघून गेला. त्यानंतर थोड्याच वेळात फिर्यादीच्या अकाऊंट मधून तीन ट्रान्झॅक्शन मधून एकूण २८,०००/- रुपये काढून बँक बॅलन्स झिरो केला होता. यावरून उमरखेड पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ७५९/२०२६ कलम ३१६, ३१८ भा.न्या.संहिता प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

 

सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आरोपीला तात्काळ अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी.बी. पथकाने घटनास्थळाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज, गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अज्ञात आरोपी सय्यद कमालउद्दीन खान वय ३६ वर्षे, मूळ रा. सगरासुंदरपुर कालागंज, जिल्हा प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा. यादव मिश्रालाल चाळ, यादव नगर, खैरानी रोड, साकीनाका अंधेरी (पश्चिम) यास निष्पन्न करून त्याच्या राहत्या घरी मुंबई येथे जाऊन शोध घेतला असता त्याच्या घरातून गुन्ह्यातील ए.टी.एम. एक्सचेंज करून लबाडीने मिळवलेली फिर्यादीची एकूण रोख रक्कम २८,०००/- रु. जप्त करून गुन्हा कौशल्यपूर्ण रितीने उघडकीस आणला आहे.

 

सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. गुरव कायंदे पाटील सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, ठाणेदार मा. शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार पंतगे, पो.हवा. संदीप ठाकूर, पो.हवा. चंदन जाधव, पो.हवा. अतुल तागडे, पो.कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. शंशशील टेंबरे, पो.कॉ. विष्णू राठोड, चापोकॉ रुद्रा सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख

संपर्क : 9067934036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *