*अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई*
दोन ट्रॅक्टरसह २ ब्रास वाळू जप्त; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल, १५ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया, दि. २२ सप्टेंबर : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई केली. डुग्गीपार व गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन ट्रॅक्टर व २ ब्रास वाळू असा एकूण १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. २१ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत असताना डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालईटोला ते देविटोला मार्गावर ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी देविटोलाकडून येणारा ट्रॅक्टर अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉली किंमत ७ लाख रुपये आणि १ ब्रास वाळू किंमत ६ हजार रुपये, असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोहळीटोला, ता. सडक अर्जुनी येथील उमाकांत मनोहर लंजे (वय ३२) याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारंजा ते डव्वा मार्गावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी करण्यात आली. कारंजाकडून येणारा ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.
या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉली किंमत ८ लाख रुपये व १ ब्रास वाळू किंमत ६ हजार रुपये, असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जगदीश कोहळे (वय ३८, रा. कवलेवाडा, गोंदिया) आणि ट्रॅक्टर मालक दिनेश तांडेकर (वय ३५, रा. कवलेवाडा, गोंदिया) यांच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने २ ब्रास वाळू आणि दोन ट्रॅक्टर जप्त करून एकूण १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोमेन्द्रसिंग तूरकर, दीक्षितकुमार दमाहे, भोजराज बहेकार, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, पोलीस शिपाई सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर व चालक पोलीस शिपाई विलेश ठाकरे यांच्या पथकाने केली.
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी महादेव शेंन्डे
